हमाल माथाडी कायद्याच्या अस्तित्वासाठी हमालांनी एकजुटीने लढा देण्याची गरज : पवार
लोकनेते शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण व संघर्ष गाथा या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते संपन्न
संजय ठोंबरे
अहमदनगर : हमाल माथाडी कायद्याने हमालांना संरक्षण मिळाले. हा कायदा महाराष्ट्राने दिला . पण हाच कायदा मोडीत काढण्याचे काम करण्यात येत आहे. ते जर झाले तर कामगार कष्टकरी हमाल मापाडी वर्गावर मोठा अन्याय होईल तो दूर करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याची गरज आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले.
नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महासंघाच्या २१ राज्यस्तरीय द्विवार्षिक अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी हमाल मापाडी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव हे होते . यावेळी राज्य शासनाच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष, आदर्श गाव हिवरेबाजार चे सरपंच पदमश्री पोपटराव पवार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, स्वागताध्यक्ष आ. संग्राम जगताप, राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ . हरीश धुरट, राजकुमार घायाळ, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण कडू,गोविंदराव सांगळे, मधुकर खताळ, रमझान पठाण, कृष्णा चौगुले , बाबा अरगडे, सूर्यकांत पाटील, सुभाष वारे , मधुकर केकाण उपस्थित होते.
अधिवेशन सुरु होण्या अगोदर माजी नगराध्यक्ष , नगर जिल्हा हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष स्व. शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे हमाल पंचायतीच्या प्रांगणात अनावरण करण्यात आले . त्यानंतर उदघाटन समारंभास सुरुवात झाली. यासाठी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे भाजीपाला भुसार विभागातील प्रांगणात भव्य मंडप उभारण्यात आला होता.
जेष्ठ हमाल शॆख रज्जाक, कलाबाई उल्हारे , श्रीमती नलावडे , सुखदेव दळवी , द्रौपदाबाई अंधारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अधिवेशनास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश घुले यांनी केले.
यावेळी बोलताना ना. शरद पवार पुढे म्हणाले की , महाराष्ट्र राज्याने अनेक कायदे देशाला दिले. हमाल माथाडी कामगार कायदा या कायद्याने जो काबाड कष्ट करीत आहे त्याला खऱ्या अर्थाने हाताला काम, खिशाला दाम आणि कष्टकऱ्यांना संरक्षण मिळते आहे. हा कायदा काही सुखासुखी झाला नाही तर त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला , तत्कालीन बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील यांच्यासोबत डॉ. बाबा आढाव तसेच इतर कामगार नेते आणि आम्ही लढा दिला आणि हा कायदा झाला. यामुळे सामान्य कष्टकरी हमाल माथाडी पण आज या कायद्यावर हल्ला करण्याचे काम काही लोक करीत आहेत. हा कायदा महाराष्ट्रात पहिल्यांदा लागू झाला यामुळे हमाली माथाडी काम करणार्या वर्गाच्या जीवनात एक प्रकारची शास्वती आली. त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित पणे सुरु असताना फडणविस सरकारने हा काड्या रद्द करण्याचा घाट घातला. गुंडगिरी दमदाटी आणि अन्य मार्गाचा आधार घेत हमाल मापाडी कष्टकऱ्यांच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु केला. जर हा कायदा रद्द झाला तर तो हमाल वर्गावर मोठा अन्याय असेल तेव्हा यासाठी मोठा लढा एकजुटीने उभा करण्याची गरज आहे.
लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या विषयी बोलताना पवार म्हणाले की, ज्यांनी आपल्या आयुष्यातील महतवाचा काळ माथाडी आणि हमाल यांच्यासाठी दिला ते लोकनेते शंकरराव घुले यांचा पुतळा आज उभारण्यात आला. दादा भाऊ कळमकर शंकरराव आणि अनेक वर्ष एकत्र काम केले. पालिकेत २५ वर्षे नगरसेवक, ७ वर्ष नगराध्यक्ष आणि अनेक वर्ष माथाडी कामगारांसाठी खस्ता खाणारा नेता म्हणून शंकरराव यांची ओळख हि आपणा सर्वाना आहे. आज त्यांचे स्मरण आपणा सर्वाना राहावं यासाठी त्यांचा पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण माझ्या हस्ते झालं. हमालांच्या संदर्भात प्रा.गणेश भगत यांनी लिहिलेला काव्यसंग्रह मी तो भारवाही प्रसिद्ध केला. त्यांचा लोकनेते शंकरराव घुले यांचा अविनाश घुले व प्रा.गणेश भगत संपादित चरित्र ग्रंथ संघर्ष गाथा प्रकाशित केली. त्यासोबत बाबा आढाव यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित झाले. आदरणीय बाबा आढाव यांना मी त्यांचे वय विचारले ते म्हणाले जास्त नाही फक्त ९१ , म्हणजे या वयात देखील कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी लढणारा हा तरुण महाराष्ट्रात आहे हे खरोखरच महाराष्ट्रासाठी भाग्य आहे. त्यामुळे हे आगळे वेगळे असे अधिवेशन आहे. आज देशामध्ये चित्र बदलते आहे. एका बाजूने काही शक्ती अशा आहेत जे पाच पन्नास वर्ष समाजाला या देशाला बळजबरीने मागे नेण्याचे काम करीत आहे. जात धर्म या मध्ये सामान्य लोकांच्या मध्ये संघर्ष कसा होईल यांची खबरदारी घेत आहेत. हा संघर्ष सामान्य लोकांमध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावाने होत असल्याने देशाचे चित्र बदलते आहे. एक राजकीय पक्ष ज्याच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे. ती सत्ता समाजासाठी समाजातील लहान कष्टकरी लोकासाठी नाही. हमालासाठी नाही . नगर जिल्हा हा चळवळीचा पुरोगामी जिल्हा आहे. पण याच जिल्ह्यात जातीच्या आणि धर्माच्या नावावर दुफळी निर्माण करण्याचे काम होते आहे. शेवगाव मध्ये आज जे चालू आहे. त्यामुळे जाती जाती मध्ये भांडणे हे थांबवले पाहिजे नाहीतर आपण उध्वस्त होऊ हा समाज उध्वस्त होईल.
यावेळी स्वागताध्यक्ष आ. संग्राम जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले की कोविड नंतर प्रथमच हे अधिवेशन होते आहे. हमाल मापाडी, माथाडी, कामगार कष्टकरी वर्गाच्या उद्धारासाठी महामंडळ स्थापन झाले. त्यासोबत आदरणीय बाबा आढाव यांनी हमाल पंचायत स्थापन करून या वर्गाला शाश्वत सुविधा मिळवून दिल्या. तरी देखील या वर्गाच्या अनेक समस्या आहेत. त्याची सोडवणूक प्राधान्याने झाली पाहिजे परंतु तसे होताना दिसत नाही. सामान्य माणसाचे ऐकून घेण्याची इच्छा सरकारी नाही हा खरोखरीच दुर्दैवाची बाब आहे.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात अधिवेशनाचे संयोजक नगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले म्हणाले की, सध्या हमाल मापाडी महामंडळाचा कारभार अतिशय गलथान पणे सुरु आहे. या कायद्याची अंमलबजावणी काटेकोर पणे कायदेशीर पद्धतीने झाली तर हमाल संरक्षित होईल माथाडी मंडळ जर सक्षम झाले तरच कामगारांचे प्रश्न सुटतील. आमची जिल्हा हमाल पंचायत प्रत्येक कामगारांमागे अतिशय खंबीर पणे उभी आहे. माथाडी कायदा वाचला पाहिजे पण शिंदे फडणवीस सरकार , भाजप हा कायदा बुडविण्याचा मागे आहे . ते आम्ही कदापि होऊ देणार नाही
अध्यक्षीय मनोगत बाबा आढाव यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की शंकरराव घुले यांनी हमालांच्या उद्धारासाठी आपले जीवन वेचले. हमाल पंचायत जिल्ह्यात रुजवावी यासाठी ते मला घेऊन नगर जिल्ह्याच्या गावागावात फिरले . त्यांनी हमालासाठी जे केले त्याचा आज गौरव झाला. या देशात घटनेचे राज्य आहे धर्माचे हा खरा प्रश्न आहे. हा लढा साधा नाही इंग्रजाना घालविणे प होते पण आज राजकारण हा छिनाल पणा झाला आहे. तुम्ही मला या वयात आगे बढो सांगता आता पुढे येण्याची तुमच्या सारख्या तरुणाची वेळ आहे. बाबासाहेबांच्या घटनेत ज्या पद्धतीने सांगितले गेले त्या प्रमाणे न्याय आणि समान संधीसाठी सर्वानी एकत्र येऊन लढले पाहिजे . लोकशाही टिकवण्यासाठी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो लढा सुरु आहेत त्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत.
यावेळी पोपटराव पवार यांचे भाषण झाले. ते म्हणाले कि , शंकरराव घुले हे कुस्तीपटू म्हणून सुपरिचित होते. एक मित्र म्हणून जेव्हा आम्ही जवळ आलो तेव्हा त्यांच्यातले माणूसपण मला विशेष भावले आणि आम्ही नाते संबंधाने देखील बांधले गेलो. कामगार कष्टकरी वर्गासाठी अण्णांनी जे केले ते एक महान कार्य आहे. आज त्याच हमाल मापाडींच्या राज्य अधिवेशनाला शरद पवार उपस्थित आहेत. देशाच्या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या नेतृत्वाने फार मोठा आधार दिला. मातीचे ज्ञान आणि जाण असलेले हे नेतृत्व आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातील नगरच्या मार्केट कमिटीतील जेष्ठ हमाल आणि महिला हमालांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांचे सत्कार झाले. शंकरराव घुले यांच्या पुतळा साकारणारे प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे, विकास कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. कामगार आयुक्त पवळे यांचा विशेष सत्कार यावेळी झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. तर आभार संजय महापुरे यांनी मानले