हे कवी आपल्या "वादळांच्या पखाली"
या कवितेतून ते जीवनाशी निगडित असणारे सत्य यावर भाष्य करताना दिसतात. मानवी जीवनात जन्म- मृत्यू, इहलोक-परलोक, परमेश्वराशी एकरूप होणं,आत्मा परमात्म्याचे मिलन, मुक्ती यासाठी भगवंताची केलेली करुणामयी प्रार्थना.या साऱ्या भावभावना मानवी जीवनाला आपल्या अंतिम समयी 'परतीच्या प्रवासास' निघताना आकर्षित करीत असतात. परमेश्वराच्या भेटीची आस,ओढ लागणं ही प्रत्येकासाठी घालमेलीची विषय. मनुष्य जीवन जगताना प्रापंचिक सुखांचा परिपूर्ण असा उपभोग घेतल्यानंतर या साऱ्यातून शरीर थकल्यानंतर या संसारात मन रमत नाही. एकदम वैराग्याची भावना मनात निर्माण होते.आयुष्याच्या अंतिम समयी परमेश्वराशी एकरूप होण्यासाठीची मानवी मनाची जी घालमेल चाललेली असते ती या कवितेतून व्यक्त होताना जाणवते.
कवी म्हणतो
"कशा रुसून बसल्या
माझ्या गावच्या या वाटा
माझ्या गावच्या या वाटा
कशा रुसून बसल्या
वाट पाहता पाहता
रडू लागल्या सावल्या "
मृत्यूचे गुढ हे नेहमीच अनाकलनीय असे आहे. येथे आयुष्याच्या संध्याकाळी परमेश्वराच्या भेटीची आस लागून राहिलेली दिसून येत आहे.वार्धक्यामुळे शरीर थकल्याने जर्जर होऊन गेलेले आहे.प्रापंचिक सुखात या वयात मन रमत नसते. इहलोक सोडून आत्मा परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी आसुसलेला असतो.पण मृत्यू काही लवकर येत नाही. जणू काही तो रुसून बसला आहे. परमेश्वराच्या भेटीसाठी मन इतके आतुर-अधीर झालेले आहे की जणूकाही माहेरी जाण्यासाठी स्री ज्याप्रमाणे आसुसलेली, अधीर असते.अगदी तसेच येथे माहेर या शब्दाचा अर्थ " परलोक " माहेरी जाणे म्हणजेच काय तर परमेश्वराशी एकरूप होणे असा होय. आणि माहेरी जाण्यात प्रत्येक स्त्रीला एक वेगळाच आनंद असतो.
आत्मा परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी आसुसलेला असतो. जोवर मृत्यू येत नाही तोवर मनात एक आर्त अशी घालमेल चाललेली असते.परंतु या वाटा जणू काही रुसून बसल्या आहेत.आता हे आयुष्याचे ओझे पेलवत नाही.इहलोकात मन रमत नाही." *रडू लागल्या सावल्या"* या ओळीतली ही आर्तता दिसून येते. *सावल्या* हा शब्द येथे आयुष्यात जे प्रापंचिक सुख उपभोगले त्या सुखाला उद्देशून म्हटले आहे.परंतु हेच प्रापंचिक सुख आता जीवाला नकोसे वाटत आहे.पुढे कवी म्हणतो,
"आठवांची झाली दाटी
दूर निघता देशाला
माय शब्द घेता ओठी
जीव जिव्हाळा शोधला
कोणी केल्या सुन्या सुन्या
कुठे शोधू कशा वाटा "
इहलोकीचा हा प्रवास संपवून मी परलोकी प्रवासास निघालो आहे. अशावेळी मन सैरभैर झाले आहे. मनात आठवणी दाटून आल्या आहेत."माय शब्द घेता ओठी"येथे " *माय*" हा शब्द परमेश्वराला उद्देशून म्हटले आहे.माय म्हणजेच जणू काही परमेश्वर होय.परमेश्वराचे नाम मुखी घेतले की एक प्रकारचे सुख,आनंद प्राप्त होतो. अगदी तसेच. सासरहून माहेरी येणाऱ्या मुलीला माहेर कित्येक कोसावरून खुणावत असते. आणि अशावेळी तिच्या डोळ्यासमोर फक्त तिची *माय* तिला दिसत असते. माय हा शब्द ओठी येताच सुख, एक प्रकारचा जिव्हाळा प्राप्त होत असतो.
तर पुढे,
"कुणी केल्या सुन्या सुन्या
कुठे शोधू कशा वाटा"
या ओळीतून असे प्रतीत होते,की मानवी मन हे कायम षडरिपुत अडकलेले असते.एक प्रकारच्या बंधनात अडकलेले असते.मानवी मन,शरीर हे सदैव भौतिक सुखाच्या आहारी जात असते. काम,क्रोध,लोभ,मत्सर, मोह या विकारांच्या जाळ्यातच अडकून राहते. या विकारांच्या पलीकडेही काही आहे.ते त्याला दिसतच नाही.या सर्व विकारांवर विजय मिळवून जीवा शिवाची भेट घडून येता मानवाला मोक्ष,मुक्ती प्राप्त होऊ शकते.पुढे कवी म्हणतो,
"डोळ्यातल्या वाती ओल्या
कशा कोरड्या पेटल्या
वादळांच्या त्या पखाली
रित्या भरून वाहिल्या"
मनुष्य जन्माला आल्यानंतर आयुष्यभर ज्या सुखांचाउपभोग घेतो तो खरच सुखी, समाधानी,आनंदी असतो का ? हा प्रश्न उरतोच प्रापंचिक संकटांची धग याने सारे जीवन पोळून निघालेले आहे. आयुष्यात येणारे संकट, वादळ, हाल-अपेष्टा यामुळे मानवी जीवन पुरते ढवळून निघाले आहे.म्हणजेच एकंदरीत संपूर्ण मानवी जीवन हे एक प्रकारचं वादळच आहे.अन या *वादळांच्या पखाली* निव्वळ रित्याच भरून वाहिल्या. आयुष्याचं ओझे फक्त इकडून तिकडे टाकण्यात फरपटत गेले आहे.यात फारच आनंद नसतो.पुढे कवी म्हणतो,
"तिन्ही सांजेला गावच्या
कशा पेटतात चुली
जशा पहिल्या खेपेला
पावसात ओल्या मुली
पुसतील आयाबाया
कसा रुतला ग काटा"
येथे तिन्ही सांजेला म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी कशा पेटतात चुली. यातून कवीला हे सुचवायचे आहे की, *चुल* याचा अर्थ असा,मानवाच्या इच्छा,आकांक्षा,अपेक्षा, भोग,विषय सुखाची लालसा या साऱ्या भावभावनांचा कल्लोळ. या साऱ्यांचं मी समर्पण करीत आहे.मनात असणारे षडरिपू यांना अग्नीत स्वाहा करीत आहे.सारे काही त्यागून मी नव्याने रिक्त हस्ताने या प्रवासास निघत आहे. हे सर्व करीत असताना,
"पुसतील आया बाया
कसा रुतला गं काटा"
आया बाया म्हणजे हेच षडरिपू पुन्हा माझ्या भोवती पिंगा घालतील आणि विचारतील या
सुखापासून तू आयुष्य सजविलेस,सर्व गोष्टींचा उपभोग घेतला आणि मग आत्ताच ही सुखे का बरं काट्यांप्रमाणे टोचावीत?पुढे कवी म्हणतो,
"धूर जाई गगनात
दिला सांगावा माहेरी
वाट सरता सरेना
कुठे चुकली तयारी "
मनात असणाऱ्या इच्छा, आकांक्षा,भोग,षडरीपुना ज्या अग्नीत( चुलीत ) स्वाहा केले त्यातून निघणारा जो धूर आहे. त्या धुरामार्फत मी आकाशी " परमेश्वराला " सांगावा धाडला आहे की, मी तुझ्या भेटीसाठी आनंदाने येत आहे.येथे कवीने *परलोक* यासाठी *माहेरी* हा शब्दप्रयोग योजिला आहे. ज्याप्रमाणे सासुरवाशीण स्री माहेराला जाण्यासाठी आसूसते,निरोपही धाडते. मुराळी येऊन आपल्याला माहेरी घेऊन जाईल यासाठी ती माहेराच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. अगदी त्याप्रमाणे मी वाट पाहत आहे. पण हे वाट पाहणे सरता सरत नाही. अन कुठे चुकली तयारी तेही समजत नाही. एक प्रकारची अधीरता यातून व्यक्त होताना दिसते. पुढे कवी म्हणतो,शेवटच्या या ओळी मनाला भावणाऱ्या आहेत. कवितेचा शेवट हा अत्यंत सुंदर असा केलेला आहे.
" गाणं मनातलं ओठी
घाले रात्रभर पिंगा
माय भेटली पोरीला
रोज खेळते शिमगा
गेली ओहोटी वाहून
आल्या भरतीच्या लाटा "
शेवटच्या या ओळीत असे जाणवते की आत्मा परमात्म्यात विलीन झालेला आहे.जेव्हा हा आत्मा शरीरातून निघून परमेश्वरास जाऊन भेटतो. तो जो एक सोहळाच असतो. याचे वर्णन कवीने यात केलेले आहे.ज्याप्रमाणे माहेरी गेल्यानंतर मुलगी आईला भेटते.तिच्या कुशीत जाऊन स्थिरावते.यातून एक आनंदाची अनुभूती प्राप्त होते.आईच्या कुशीत मायेच्या छत्रछायेखाली आनंदाने मन पिंगा घालते आहे.जणू काही चोहोबाजूंनी रंगाची उधळण होत आहे. आनंदाला बहर आला आहे.एक प्रकारचे सुख समाधान प्राप्त झाले. अन जणूकाही,
"माय भेटली पोरीला
रोज खेळते शिमगा "
जणू काही आनंदाचा उत्सव साजरा होत आहे. अन दुःख सारे सरून भरतीच्या सुखाच्या लाटा अंतरंगात उफाळून आल्या आहेत. आणि आनंदाच्या भरतीच्या या लाटा येताच *वादळांच्या पखाली* ही भरभरून वाहत आहेत. शेवटी मज असेच म्हणावेसे वाटते,
" मोक्ष निर्वाणाचं दान
द्यावे माझ्या पदरात
उधार असे जन्म
राम नसे संसारात
प्रभावती चव्हाण ( नाशिक )