मालनगाव धरणातील पाणी अखेर सोडले; 17 गावांच्या पाणीटंचाईवर दिलासा

श्री संजय बच्छाव
धुळे विभागीय संपादक
दैनिक स्वराज्यदूत

 साक्री तालुक्यातील तब्बल 17 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक, शेतकरी आणि पशुधन पाण्यासाठी हवालदिल झाले होते. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मालनगाव धरणातील पाणी सोडण्यासाठी आज जलसमाधी आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून प्रशासनाने धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी सकाळी 10 वाजता तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली मालनगाव धरण परिसरात जलसमाधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून गुरेढोरांनाही पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.



आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता साक्री पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. सहायक पोलिस निरीक्षक अनिल बागुल यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय प्रसाद रौंदळ, राजू जाधव तसेच मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता.

या आंदोलनात तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, गणेश गावीत, संदीप भोये, शिवाजी चौरे, दिगंबर बापू, वसंत राठोड, युवराज महाले, सूर्यकांत ठाकरे, यशवंत बागुल, भाऊसाहेब गांगुर्डे, मधुकर बागुल, युवराज महाले,संजय गांगुर्डे,यांच्यासह युवक व स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, खासदार एडव्होकेट. गोवाल पाडवी यांनी मालनगाव धरणातील पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला होता.तरीदेखील पाणी सोडण्यात आले नाही आज जलसामधी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता त्यानुसार संबंधित पाटबंधारे विभागाला आदेश प्राप्त झाले. अखेर पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता भोई यांनी पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली.



जनशक्तीपुढे प्रशासन झुकले!

साक्री तालुक्यातील नागरिकांच्या पाण्याच्या हक्कासाठी उभारलेल्या या जलसमाधी आंदोलनामुळे प्रशासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे 17 गावांतील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आंदोलनकर्त्यांच्या एकजुटीचा हा विजय मानला जात आहे.

घोषणा गाजल्या...

"पाणी आमचा हक्क आहे!"
"जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहील!"
"मालनगाव धरणाचे पाणी सोडा, जनतेला न्याय द्या!"

अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.